महाराष्ट्र हे राज्यातील गरजू नागरिकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबविणारे प्रगामी राज्य आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६०% महिला व बालके आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये महिलाभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व महिलाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकातील महिलांपर्यंत पोहोचविणे हा प्रमुख उद्देश ठेवून तसेच राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणे व जनजागृतीच्या माध्यमातून चळवळ निर्माण करणे, अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे तसेच महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याच्या हेतूने विशेष अभियान राबविण्याची व आदर्शवती अभियान उत्कृष्ठपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यातील महिला व बालकांची मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या व राज्यातील महिलांच्या जीवनात येणाऱ्या समस्या व त्यांच्या सबलीकरणासंदर्भात भेडसावणाऱ्या समस्या, ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सन 2025-26 पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे महिलांसाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना / उपक्रम / कार्यक्रम इ. बाबत आवश्यक व उपयुक्त माध्यमाद्वारे प्रचार प्रसिद्धी देऊन जनमानसांमध्ये याबाबतची जनजागृती करण्यात येईल. यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना “आदिशक्ती पुरस्कार” देऊन गौरविण्यात येईल.
१) तालुक्यामध्ये “आदिशक्ती अभियान” उत्कृष्टपणे राबविणाऱ्या तीन ग्रामस्तरीय समित्यांची /
ग्रामपंचायतीची निवड तालुकास्तर समिती करेल. तालुकास्तरीय समिती सदस्य एकत्रितपणे वरील
तीन ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांनी केलेल्या कामाचे भौतिक निरीक्षण करतील
व नंतरच तालुकास्तरीय समिती निवड केलेल्या तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर करेल.
२) प्रत्येक तालुक्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार मिळालेल्या ग्रामस्तरीय
समित्यांचे /
ग्रामपंचायतीचे तालुकानिहाय प्रस्ताव जिल्हास्तरीय समिती एकत्र करेल व या निवडलेल्या
विजेत्यांमधून गुणवत्तेनुसार जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार जाहीर करेल.
३) प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार मिळालेल्या ग्रामस्तरीय तसेच द्वितीय व तृतीय
पुरस्कार मिळालेल्या समित्यांचे / ग्रामपंचायतीचे जिल्हानिहाय प्रस्ताव विभागस्तरीय समिती
एकत्र करेल व या निवडलेल्या विजेत्यांमधून गुणवत्तेनुसार राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय व
तृतीय पुरस्कार जाहीर करेल.
| अ.क्र. | पुरस्कार स्तर | प्रथम | द्वितीय | तृतीय |
|---|---|---|---|---|
| 1 | तालुकास्तरीय पुरस्कार | रु. १ लक्ष | रु. ५० हजार | रु. २५ हजार |
| 2 | जिल्हास्तरीय पुरस्कार | रु. ५ लक्ष | रु. ३ लक्ष | रु. १ लक्ष |
| 3 | राज्यस्तरीय पुरस्कार | रु. १० लक्ष | रु. ७ लक्ष | रु. ५ लक्ष |